पिंजर-बाशीटाकळी येथे होणार निवड चाचणी; अमरावतीत ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान राज्य अजिंक्यपद स्पर्धा

मूर्तिजापूर : तलवारबाजी अर्थात फेन्सिंग या क्रीडा प्रकारात अकोला जिल्ह्यातील युवा खेळाडूंना राज्यस्तरावर झेप घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य तलवारबाजी (फेन्सिंग) असोसिएशन व अमरावती जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान अमरावती येथे ३४वी ज्युनियर मुला-मुलींची राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी अकोला जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानप्रकाश विद्यालय, पिंजर (ता. बाशीटाकळी) येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी घेण्यात येणार आहे.या निवड चाचणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, निवड झालेल्या खेळाडूंना अमरावती येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करता येणार आहे.

संजय इसाळकर, अजिंक्य तिडके यांचे खेळाडूंना आवाहनअकोला जिल्हा तलवारबाजी (फेन्सिंग) असोसिएशनचे सचिव संजय इसाळकर आणि कोषाध्यक्ष अजिंक्य तिडके यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र व इच्छुक खेळाडूंनी या निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

ग्रामीण भागातही तलवारबाजीची चांगली गुणवत्ता असलेले अनेक खेळाडू असून, त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.“जिल्ह्यातील खेळाडूंनी केवळ सहभागी न होता आत्मविश्वासाने मैदानात उतरावे आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राज्यस्तरीय संघात स्थान मिळवावे. अकोला जिल्ह्याचे नाव राज्याच्या क्रीडाक्षेत्रात उज्ज्वल करण्यासाठी ही निवड चाचणी महत्त्वाची संधी आहे,” असे संजय इसाळकर व अजिंक्य तिडके यांनी सांगितले.

तलवारबाजी हा खेळ वेग, चपळता, एकाग्रता, शारीरिक क्षमता आणि धाडस यांचा संगम मानला जातो. अकोला जिल्ह्यातील युवा खेळाडू या खेळात सातत्याने मेहनत घेत असून, या निवड चाचणीमुळे त्यांच्या गुणवत्तेला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळणार आहे.या निवड चाचणीसंदर्भात प्रा. सुभाष ठाकरे (सहसचिव), मुंकद पैकेट, अभिजीत गोमाशी, अमित मनवसकर तसेच अकोला येथील विवेक भागवत यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.अकोल्याच्या मातीत मेहनत घेणाऱ्या युवा तलवारबाजांच्या जिद्दीला आता राज्यस्तरीय व्यासपीठाची साथ मिळणार असून, ६ सप्टेंबरच्या निवड चाचणीतून अकोल्याच्या क्रीडाक्षेत्रातील नव्या प्रतिभेचा शोध लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us