तिसऱ्या सोमवारी यात्रेला भक्तांचा उदंड प्रतिसाद; २२ किमीचा पायी प्रवास करून भाविक धारगडमध्ये दाखल, चोख पोलिस बंदोबस्तामुळे यात्रा शांततेत पार

अकोट : सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्रीक्षेत्र धारगड येथील प्रसिद्ध महादेव यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. वर्षातून एकदा श्रावणातील तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या या यात्रेला यंदा हजारो शिवभक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. धारगडच्या गुफेतील भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती.धारगड यात्रेसाठी पोपटखेड नाक्यावरून भाविकांना प्रवेश देण्यात आला. पोपटखेडपासून धारगडपर्यंत सुमारे २२ किलोमीटरचा प्रवास करून भाविक यात्रास्थळी पोहोचले. त्यानंतर साधारण दीड ते दोन किलोमीटरचा डोंगराळ मार्ग अनेक भाविकांनी पायी पार करून गुफेतील महादेवाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे अनेक शिवभक्तांनी संपूर्ण २२ किलोमीटरचा प्रवासही पायी केला. यात महिला भाविकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.*चोख पोलिस बंदोबस्त; पोलिसांच्या कार्याचे कौतुक*यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वन विभाग आणि अमरावती ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चप्पाचप्प्यावर पोलिस यंत्रणा सतर्क होती. वाहनांची तपासणी, भाविकांची सुरक्षितता आणि गर्दीचे नियोजन याकडे पोलिसांनी विशेष लक्ष दिले.यात्रेदरम्यान कोणत्याही भाविकाला त्रास होऊ नये, याची पोलिसांनी पुरेपूर काळजी घेतली. शांतपणे आणि संयमाने आपले कर्तव्य बजावत पोलिसांनी भाविकांना आवश्यक ते सहकार्य केले. पोलिसांच्या या सेवाभावी भूमिकेचे भाविक आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. यात्रेदरम्यान मिळालेल्या सहकार्याबद्दल अनेक भाविकांनी पोलिसांचे आभार मानले.

सुरक्षेसाठी नदीपात्रात प्रवेशबंदी*भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात प्रवेश करण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. वन विभाग आणि पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत भाविकांनीही सहकार्य केल्यामुळे यात्रा शांततेत पार पडली

ठिकठिकाणी फराळ, महाप्रसाद आणि आरोग्यसेवा*धारगड यात्रेसाठी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी अकोटच्या शिवाजी चौकासह विविध ठिकाणी स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून फराळाचे वितरण करण्यात आले. धारगड येथे भाविकांसाठी महाप्रसाद, वैद्यकीय उपचार चहा, फराळ, आणि विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. नरनाळा किल्ल्यावरही परतीच्या यात्रेकरूंसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

रेल्वे व बससेवेलाही मोठा प्रतिसाद*
धारगड यात्रेसाठी अकोल्याहून रेल्वेने मोठ्या संख्येने भाविक रवाना झाले. तसेच अकोटहून विशेष बससेवाही उपलब्ध करून देण्यात आली होती. यात्रा संपन्न होत असताना परतीच्या प्रवासासाठीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
भक्तिभाव, उत्साह, सामाजिक सहकार्य आणि प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे यंदाची श्रीक्षेत्र धारगड महादेव यात्रा उत्साहात आणि शांततेत संपन्न झाली. हजारो शिवभक्तांनी भोलेनाथाचे दर्शन घेत हर हर महादेवच्या जयघोषात यात्रेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us