
अकोला : पुनर्विवाहासाठी व्हॉट्सॲप ग्रुपवर बायोडाटा टाकणाऱ्या ४१ वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करून, आपण नायब तहसीलदार असल्याचे भासवत बनावट ओळखपत्र तयार करून तिच्याशी धार्मिक पद्धतीने विवाह करणाऱ्या आरोपीला सिव्हील लाईन पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिती इर्शाद शेख उर्फ प्रिती प्रशांत बोरकर (वय ४१, रा. न्यू तापडिया नगर, अकोला) यांनी पुनर्विवाहासाठी व्हॉट्सॲप ग्रुपवर आपला बायोडाटा टाकला होता. त्यानंतर संदीप उर्फ सुवर्णदिप पुरुषोत्तम वानखडे (वय ३९, रा. पातुर्डा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) याने त्यांच्याशी संपर्क साधला.
आरोपीने आपण नायब तहसीलदार असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यासाठी नायब तहसीलदाराचे बनावट ओळखपत्रही तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत धार्मिक पद्धतीने विवाह करून सुमारे दोन महिने तिच्यासोबत वास्तव्य केले. यादरम्यान फिर्यादीची १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३१९(२), ३१८(४), ३३६(३), ३४०(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे त्याचा शोध घेत पातुर्डा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा येथून आरोपीला ताब्यात घेत अटक केली. त्याला जिल्हा न्यायालय, अकोला येथे हजर केले असता न्यायालयाने दि. ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालती कायटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन घाटोळे (ब.नं. २२३२) आणि पोलीस कॉन्स्टेबल शाम तोंडे (ब.नं. १३४२) यांनी केली
फसवणुकीच्या या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हील लाईन पोलीस करीत आहेत.