शर्वरी हत्या प्रकरणात मोठी कारवाई! आनंद भडला गोंदियातून अटक

अमरावती : शहरातील शर्वरी गणेश हाडके हत्या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आनंद नंदकिशोर भड याला पोलिसांनी गोंदिया रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला.

शर्वरी हाडके ही अमरावतीतील बियाणी सायन्स कॉलेजमध्ये बीएससी प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती. गुरुवारी ती कॉलेजला जाण्यासाठी दुचाकीवरून घराबाहेर पडली होती. रविनगर परिसरातील नाल्याच्या पुलाजवळ आनंद भड याने तिची दुचाकी अडवल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या हल्ल्यात शर्वरीच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर चाकूने वार झाल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीने आपली दुचाकी एका ठिकाणी ठेवून रेल्वेने अमरावतीबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपासात समोर आली. त्याचा माग काढत राजापेठ पोलिसांचे पथक गोंदिया रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले. जीआरपीच्या मदतीने आरोपी आनंद भड याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शर्वरी आणि आनंद एकमेकांना सुमारे दोन वर्षांपासून ओळखत होते. काही काळापासून शर्वरीने आनंदशी बोलणे बंद केले होते. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण, हल्ल्याचे पूर्वनियोजन होते का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कोठडीदरम्यान हत्येत वापरलेले शस्त्र, आरोपीचा घटनाक्रम, प्रवासाचा मार्ग तसेच इतर महत्त्वाचे पुरावे तपासले जाणार आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर शर्वरीच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि प्रकरणाचा जलदगतीने तपास करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत असून, तपासातून हत्येमागील संपूर्ण सत्य आणि नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us