
मूर्तिजापूर : शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर तालुक्यातील तब्बल ५० गावांमध्ये सभा घेण्यात आल्या असून, या माध्यमातून संपूर्ण तालुका पिंजून काढण्यात आला आहे. कर्जमाफी, पीकविमा, बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि दुष्काळी उपाययोजनांसह विविध मागण्यांसाठी आता हजारो शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकवटत आहेत.
गावोगावी झालेल्या सभांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांबाबत माहिती देत १० सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर बैलजोड्यांसह होणाऱ्या ‘काळा पोळा’ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या सभांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा प्रगती शेतकरी मंडळाकडून करण्यात आला आहे.

पावसाची अनिश्चितता, खरीप पिकांची खराब झालेली परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका मंडळाने घेतली आहे.
“ही लढाई कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. ५० गावांतील शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद हा त्यांच्या असंतोषाची तीव्रता दर्शविणारा आहे,” अशी भूमिका प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी मांडली
दरम्यान, १० सप्टेंबर रोजी हजारो शेतकरी बैलजोड्यांसह तहसील कार्यालयावर धडकणार असल्याने प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.