
चांदूरबाजार : तालुक्यातील शिरजगाव कसबा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीने सोमवारी एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला. दिनेश आवारे हे आपल्या कपाशीच्या शेतात युरिया खत टाकत असताना वाघिणीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेहाजवळच बसलेल्या वाघिणीला वनविभागाने ड्रोनच्या मदतीने शोधून ट्रॅक्यूलाईझ करून ताब्यात घेतले.
दिनेश आवारे सकाळी शिरजगाव कसबा येथून कालाटोला मौजेतील आपल्या अडीच एकर शेतात गेले होते. दुपारपर्यंत ते घरी परतले नाहीत आणि फोनही उचलत नसल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी शेतात शोध घेतला. त्यावेळी रक्ताने माखलेली पॅन्ट आणि मोबाईल आढळल्याने संशय बळावला. वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली
वनविभागाने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे परिसराची पाहणी केली असता दिनेश आवारे यांचा मृतदेह आणि त्याच्याजवळ बसलेली वाघीण दिसून आली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने सावधगिरीने कारवाई करत वाघिणीला ट्रॅक्यूलाईझरचा डार्ट मारला. डार्ट लागल्यानंतर ती सुमारे ३० ते ४० मीटर पळाली आणि बेशुद्ध होऊन कोसळली. त्यानंतर तिला यशस्वीरीत्या ताब्यात घेण्यात आले.
पुण्याहून आलेल्या रेस्क्यू पथकाच्या मदतीने वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरकडे नेण्यात येत होते. मात्र, पकडण्याच्या कारवाईदरम्यान दोन डार्ट देण्यात आल्याने बेशुद्धीच्या औषधाचा परिणाम अधिक झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रवासादरम्यान वाघिणीची प्रकृती अचानक खालावल्याने मोर्शी येथील एका मैदानात वाहन थांबवून तज्ज्ञांच्या उपस्थितीत तिच्यावर आपत्कालीन उपचार सुरू करण्यात आले. रात्री साडेआठच्या सुमारास वाघिणीला ऑक्सिजन लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली
मृतदेहाची अवस्था पाहून अंगावर काटावाघिणीने दिनेश आवारे यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले होते. मृतदेहाजवळ पोहोचलेल्या नागरिक व वनविभागाच्या पथकाला त्यांच्या मानेचा भाग पूर्णपणे गायब झालेला, तर एका हाताचे लचके तोडलेले दिसून आले. या भीषण घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तीन मुलींच्या डोक्यावरून पितृछत्र हरपलेदिनेश आवारे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत. कुटुंबातील तेच कर्ते व्यक्ती असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरपला आहे. तीन मुलींच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.गेल्या २० दिवसांपासून या नरभक्षक वाघिणीची दहशत परिसरात होती. शेतकऱ्याच्या बळीच्या घटनेनंतर अखेर वनविभागाने वाघिणीला जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, वाघिणीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचार आणि तिच्या स्थितीकडे वनविभागाचे लक्ष लागले आहे.