पारंपरिक कावड यात्रेत बालभक्तीचा अनोखा आविष्कार; विजय अग्रवाल यांच्या हस्ते कु. श्री संतोषवाडीचा सत्कार

अकोला : अकोला जिल्ह्याची पारंपरिक आणि श्रद्धेची ओळख असलेल्या कावड यात्रेत यंदा एका चिमुकलीने आपल्या भक्ती आणि धाडसाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोठमोठ्या कावडी खांद्यावर घेऊन भक्तगण कावड यात्रेत सहभागी होत असताना, कु. श्री संतोषवाडी या चिमुकलीने आपल्या खांद्यावर तब्बल दोन भरण्यांची कावड घेऊन सहभाग नोंदविला. तिच्या या अनोख्या भक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अकोला जिल्ह्यात कावड यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून, श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव म्हणून वर्षानुवर्षे साजरी केली जाते. या यात्रेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारो भाविक उत्साहाने सहभागी होतात. पारंपरिक वाद्यांचा गजर, भगव्या पताका आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात कावडधारी भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो.याच भक्तिमय वातावरणात या चिमुकलीने दोन भरण्यांची कावड खांद्यावर घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या भक्तीभावाचे आणि धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले. कावड स्वागत समारंभात विजय अग्रवाल यांच्या हस्ते कु. श्री संतोषवाडीचा सत्कार करण्यात आला.

लहान वयातच धार्मिक परंपरेशी जोडले जात, कावड यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या या चिमुकलीचे कौतुक होत असून, अकोल्याच्या कावड परंपरेत बालभक्तीचा हा प्रसंग विशेष ठरला आहे. तिच्या या सहभागातून श्रद्धेला वयाचे बंधन नसते, हेच अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us