
अमरावती:महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना आणि डॉ. बाबासाहेब महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ सप्टेंबर २०२६ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित ‘३४ वी राज्यस्तरीय ज्यूनियर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’ (मुले व मुली) च्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला जात आहे. या भव्य क्रीडा महासंग्रामाच्या पूर्वतयारीची आणि नियोजनाची अत्यंत बारकाईने पाहणी करण्यासाठी राज्य संघटनेतर्फे अधिकृत निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शेषनारायण लोंढे यांच्याकडून विशेष पाहणी
या राज्यस्तरीय स्पर्धेचे मुख्य निरीक्षक म्हणून राज्य संघटनेने नियुक्त केलेले श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोंढे (बुलढाणा) यांनी प्रत्यक्ष क्रीडा स्थळाला भेट देऊन सर्व व्यवस्थेची सखोल पाहणी केली. क्रीडांगणाची शिस्तबद्ध रचना, खेळाडूंच्या सुरक्षेची काळजी, राहण्याची व भोजनाची दर्जेदार व्यवस्था आणि आयोजनातील सुसूत्रता पाहून शेषनारायण लोंढे यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले व आयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
अजिंक्य तिडके व संजय इसाळकर यांच्या नेतृत्वाखाली भक्कम नियोजन
या स्पर्धेला भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप देण्यासाठी अकोला जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य दादा तिडके आणि अकोला जिल्हा सचिव संजय इसाळकर यांनी अत्यंत मोलाची व महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली, कल्पक नियोजनामुळे आणि अहोरात्र चाललेल्या पाठपुराव्यामुळे स्पर्धेचे आयोजन अत्यंत उच्च पातळीवर पोहोचले आहे. सर्व खेळाडूंना उत्तम सोयी-सुविधा मिळतील याची विशेष खबरदारी त्यांनी घेतली आहे.

आयोजन समिती व मार्गदर्शकांचे सहकार्यस्पर्धेला भव्यता मिळवून देण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. प्रमोदभाऊ वानखडे, सचिव डॉ. श्री. सुनील कुमार, कार्याध्यक्षा श्रीमती संगिता येवतीकर, अमरावती जिल्हा फॅन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ. श्री. विकास येवतीकर आणि सूरज येवतीकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
अमरावती येथील या तीन दिवसीय राज्यस्तरीय महासंग्रामात राज्यातील विविध जिल्ह्यांतून शेकडो ज्यूनियर खेळाडू आपले कसब दाखवणार असून, या ऐतिहासिक आयोजनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींचे डोळे या स्पर्धेकडे लागले आहेत.