मुर्तिजापूर:महान धरणातील पाणीसाठा केवळ २० टक्क्यांवर आल्याने अकोला जिल्ह्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुर्तिजापूर, बार्शिटाकळी आणि परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी मुर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांनी तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.​महान धरणातील उपलब्ध पाणी अकोला शहरासाठी राखीव ठेवावे लागत असल्याने, ग्रामीण व शहरी भागासाठी पर्यायी पाण्याचा स्रोत शोधणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यावर मात करण्यासाठी मंगरूळ कांबे, दगडपारवा आणि घुमशी-मुंगशी परिसरातील अतिरिक्त पाण्याचा वापर मुर्तिजापूर, बार्शिटाकळी व अकोला तालुक्यातील गरजू भागांसाठी करता येईल का, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.​बैठकीतील महत्त्वाचे निर्देश:​तांत्रिक अभ्यास: पाण्याच्या उपलब्धतेनुसार नवीन जलवाहिनी आणि वितरण व्यवस्थेचा तातडीने तांत्रिक अभ्यास करणे.​पर्यायी नियोजन: मंगरूळ कांबे व दगडपारवा परिसरातून पाणीपुरवठा करण्याच्या शक्यता तपासून त्वरित प्रशासकीय कार्यवाही सुरू करणे.​नियोजनबद्ध पुरवठा: नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन आतापासूनच कृती आराखडा राबवणे.​या बैठकीस उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार शिल्पाताई बोबडे, मुर्तिजापूरचे नगराध्यक्ष हर्षल साबळे, मुख्याधिकारी निलेश जाधव, नगर अभियंता, बार्शिटाकळीचे तहसीलदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.​आमदार हरिष पिंपळे यांनी प्रशासनाला सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले असून, “नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये हीच आपली प्राथमिकता आहे,” असे स्पष्ट केले. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पाण्याची नासाडी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us