
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे सार्वजनिक मंडळांना आवाहन; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपक्रम राबविण्याचे निर्देश
अकोला : जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट असून पाणी व चारा टंचाईचे संकट गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन साध्या पद्धतीने साजरे करताना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले. सण-उत्सव साजरे करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच पाणी बचत, जलस्रोतांचे संवर्धन आणि पारंपरिक वाद्यांच्या वापरातून जनजागृती करण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नियोजन भवन येथे आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह विविध सार्वजनिक उत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा
दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. मिरवणूक मार्गांवर आणि मंडळांच्या परिसरात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी संकलन, पाण्याची बचत आणि जलस्रोतांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करावी. ग्रामीण भागातील पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सव साजरे करण्यास प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले.
अष्टमी-नवमीला रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांना मुभानवरात्रोत्सवातील अष्टमी आणि नवमी या दोन दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास मुभा देण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. अकोला जिल्ह्याची सण-उत्सवांची वैभवशाली परंपरा कायम राखताना ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे, असेही निर्देश देण्यात आले.सार्वजनिक मंडळांना आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि दुर्गादेवी विसर्जन घाटांवरील आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.
महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनातउत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले. सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी तसेच गरबा स्थळी युवती व महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक आणि दत्तक अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही पोलीस स्टेशन स्तरावर आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.उत्सव काळात ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्यासह ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेसंदर्भातील नियमांचे पालन करावे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, कोणतीही अनुचित घटना किंवा संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले.
बैठकीत विविध नवदुर्गा उत्सव मंडळांच्या सदस्यांनी दुर्गादेवी स्थापना, मिरवणूक मार्ग आणि गरबा स्थळांवरील सुविधांबाबत मागण्या मांडल्या. तसेच बौद्ध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित मिरवणूक व सभास्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना मांडल्या.