अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्यासह पोलिसांची कारवाई; अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांचा धडाका

अकोला | लोक कट्टा न्यूज

अकोला जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला आणि अकोट ग्रामीण पोलिसांनी संयुक्त प्रयत्नांतून महत्त्वपूर्ण कारवाई केली. अकोट ते हिवरखेड मार्गावरील लाडेगाव फाट्याजवळ करण्यात आलेल्या कारवाईत १ किलो ९५१ ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थासह एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाडेगाव फाटा परिसरात कारवाई केली. यावेळी रोशन उर्फ तेजस रमेश कन्नाक (वय २३, रा. अडगाव बु., ता. तेल्हारा, जि. अकोला) याच्या ताब्यातील लाल-काळ्या रंगाच्या डीओ स्कुटीची झडती घेतली असता, डिक्कीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला.

ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या सहभागातून कारवाई; पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक

या कारवाईत अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख आणि संबंधित पोलीस पथकाने सहभाग घेतला. अपर पोलीस अधीक्षक बी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अंमली पदार्थांची अवैध वाहतूक रोखणे आणि तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यापासून दूर ठेवणे ही आजच्या काळातील महत्त्वाची गरज आहे. अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेली कारवाई निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्यासह कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत असून, अवैध धंद्यांविरोधातील कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २०(ब)(ii)(c) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोक कट्टा न्यूज — जनतेच्या हक्काचा आवाज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us