
प्रलंबित महसुली व अपील प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी; प्रशासनाचे पक्षकारांना आवाहन
मुर्तिजापूर | लोक कट्टा न्यूज
मुर्तिजापूर : महसुली वादांमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होऊ नये, तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा व्हावा, या उद्देशाने मुर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियानांतर्गत’ महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही लोकअदालत दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश प्रलंबित अर्धन्यायिक महसुली प्रकरणे परस्पर सहमतीने व तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढणे हा आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. विविध कारणांमुळे ही प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहतात. अनेकदा एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असमाधानी पक्षकार वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात. परिणामी प्रकरणे वर्षानुवर्षे सुरू राहून संबंधित पक्षकारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.अशा प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोड घडवून आणल्यास वाद निकाली काढण्यास मदत होऊ शकते. यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशांची बचत होण्यासोबतच अर्धन्यायिक यंत्रणेवरील कामाचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रलंबित महसुली तसेच अपील प्रकरणांमधील सर्व संबंधित पक्षकारांनी या लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुर्तिजापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोक कट्टा न्यूज | जनतेच्या हक्काचा आवाज