स्थानिक गुन्हे शाखेची जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई

अकोला | लोक कट्टा न्यूज
अकोला जिल्ह्यात अवैध जुगाराविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातील चांदखाँ प्लॉट परिसरात जुगारावर छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळत असल्याच्या आरोपावरून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ७ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध जुगारावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले होते. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी अकोला शहरात गस्त घालत असताना चांदखाँ प्लॉट येथील एका घरात पैशांची हारजीत लावून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत अरबाज खान हुसेन खान, मोहम्मद राहील मोहम्मद अकील, शेख करीम शेख इब्राहिम ऊर्फ कल्लू काटा, शेख इमरान शेख इब्राहिम, शेख जुबेर शेख इब्राहिम, मोहसीन खान जहीर खान, शेख शकील शेख जलील, मोहम्मद नवेद अब्दुल हमीद, इरशाद खान शकील खान, सुमित सुखदेव कांबळे, शेख सुमेर शेख लाला, विजय सुरेश गलांडे आणि अब्दुल रहमान अब्दुल हकीम या १३ जणांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलीस अंमलदार आणि चालक सहभागी झाले होते.
लोक कट्टा न्यूज — जनतेच्या हक्काचा आवाज!