मूर्तीजापूर (प्रतिनिधी):दसरा उत्सवाच्या पवित्र मुहूर्तावर मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेजवर पाण्यासाठी व शेतकरी प्रश्नांवर भव्य व आक्रमक आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनाची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेऊन मूर्तीजापूरच्या तहसीलदार मा. शिल्पाताई बोबडे यांनी तात्काळ मध्यस्थी केली. तहसीलदार मॅडम यांनी घटनास्थळी आणि आंदोलकांशी संपर्क साधून प्रशासनाच्या वतीने सकारात्मक चर्चा केली व आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

तहसीलदार शिल्पाताई बोबडे यांच्या मौखिक आश्वासन व आग्रही मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.प्रशासनाने आणि तहसीलदार मॅडम यांनी दिलेल्या शब्दाचा मान राखत शेतकऱ्यांनी माघार घेतली असली, तरी शासनाने भविष्यात मागण्या मान्य न केल्यास दिवाळीपूर्वी महामोर्चा आणि किसान ब्रिगेडला समर्थन म्हणून ७ डिसेंबर रोजी हजारो शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाड्या व पायदळ घेऊन थेट विधानभवनावर कूच करण्याचा स्पष्ट आणि आक्रमक इशारा देण्यात आला आहे.प्रशासकीय मध्यस्थी आणि पुढील आंदोलनाची दिशा:काटेपूर्णा बॅरेजवर पाण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले असताना, तहसीलदार शिल्पाताई बोबडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

तहसीलदार मॅडमच्या या सकारात्मक प्रयत्नांमुळे सण आणि कायदा-सुव्यवस्थेचा मान राखत शेतकऱ्यांनी आंदोलन तूर्तास थांबवले आहे. परंतु, हे आश्वासन जर केवळ कागदावरच राहिले, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात छेडले जाईल: * दिवाळीपूर्वी महामोर्चा: प्रशासनाच्या आश्वासन व विनंतीनंतर शासनाने जर वेळेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दिवाळीच्या बरोबर पाच दिवस अगोदर तालुक्यात एक विशाल महामोर्चा काढण्यात येईल. * ७ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडक: या मोर्चालाही शासनाने दाद दिली नाही, तर किसान ब्रिगेडला समर्थन म्हणून येत्या ७ डिसेंबर रोजी मूर्तीजापूर तालुक्यातील तब्बल दीडशे गावांतील शेतकरी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि पायदळ घेऊन थेट विधानभवनावर धडक देतील. शासनाने व प्रशासनाने या इशाऱ्याची गांभीर्याने नोंद घ्यावी.शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या:यावेळी शेतकरी नेत्यांच्या वतीने खालील मागण्या तातडीने मंजूर करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे: * हक्काचा पिक विमा: मागील वर्षाचा थकलेला आणि यावर्षीचा हक्काचा दुष्काळी पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात आला पाहिजे. * हेक्टरी ५० हजार रुपये मदत: दुष्काळ व पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करावी. * रब्बी पेरणीसाठी १० हजार अग्रिम: रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अग्रिम (Advance) देण्यात यावा.”

*आम्हाला भीक नको, हक्काचा पिक विमा हवा!” – राजूभाऊ वानखडे* शासनाच्या भूमिकेवर बोलताना प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तहसीलदार मॅडमच्या मध्यस्थीनंतर व प्रशासकीय विनंतीनंतर आम्ही सध्यातरी आंदोलन स्थगित केले आहे, परंतु शासन जर आम्ही ५,००० रुपये दिले आहेत असे म्हणून शेतकऱ्यांची बोळवण करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. आमची मुख्यमंत्री साहेबांना स्पष्ट विनंती व सज्जड इशारा आहे की, आम्हाला ही मदत किंवा भीक नको, तर आमच्या नियमानुसार आणि घामाचा असलेला हक्काचा पिक विमाच मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी याची जाहीर नोंद घ्यावी.”

*चर्चा व बैठकीत सहभागी प्रमुख मान्यवर:* तहसीलदार शिल्पाताई बोबडे यांच्यासोबत झालेल्या या चर्चेच्या व बैठकीच्या अनुषंगाने, काटेपूर्णा बॅरेजवर प्रत्यक्ष कोणतेही उग्र आंदोलन झाले नाही, तर प्रशासनासोबत झालेल्या यशस्वी बैठकीत आगामी रणनीती व आंदोलनाविषयी सविस्तर चर्चा पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला व चर्चेत परिसरातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मुख्यत्वे प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे, सागर मानकर, सोनू मानकर, शंकर बेले, संजय पाटील वानखडे, श्रीकांत चिकटे , श्रेयश घोरे, विकास मानकर, जांभा बु. चे सरपंच कृष्णा गावंडे, हर्षल तांबडे, आदित्य ठोकळ, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बाबानिया, प्रफुल मालदुरे आणि अरुण दादा बोंडे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us