
प्रशासनाचा निर्णय: मतदान शांततेत व पारदर्शक वातावरणात पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
मूर्तिजापूर | प्रतिनिधी
मूर्तिजापूर (विशेष प्रतिनिधी):महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघ (अमरावती विभाग) निवडणूक २०२६ चा कार्यक्रम घोषित झाला असून, सदर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय, निष्पक्ष आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर, माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, अकोला यांच्या प्राप्त आदेशानुसार दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मूर्तिजापूर शहरातील नियमित आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगर परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी आठवडी बाजाराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नियमित बाजारपेठ, तात्पुरत्या स्वरूपाची विक्री व्यवस्था अथवा दुकाने थाटण्यास सक्त मनाई राहील.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी व्यापारी, विक्रेते तसेच नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि बंदच्या नियमांचे पालन करावे, असे नम्र आवाहन मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.