श्री गुरुदेव सेवा मंडळाची राष्ट्रपतींकडे मागणी; आमदार हरीशभाऊ पिंपळे व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर

राष्ट्रसेवा, ग्रामविकास, सामाजिक समता आणि समाजप्रबोधनासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी श्री गुरुदेव सेवा मंडळ, मूर्तिजापूर तालुका समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे निवेदन आमदार हरीशभाऊ पिंपळे तसेच उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
‘ग्रामगीते’तून ग्रामविकासाचा विचारराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच राष्ट्रसेवा आणि समाजउभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून स्वावलंबी, स्वच्छ, सुसंस्कृत, व्यसनमुक्त आणि आदर्श ग्रामजीवनाचा संदेश देण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सामाजिक विषमता आणि अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात त्यांनी आपल्या कीर्तनातून व विचारांतून समाजप्रबोधन केले.
त्यांचे विचार आजही ग्रामविकास, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणादायी आहेत. राष्ट्रसंतांचे हे ऐतिहासिक योगदान लक्षात घेता, त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करणे ही त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करणारी बाब ठरेल, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली. केंद्र शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहनही करण्यात आले.
गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितश्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने निवेदन सादर करताना सुधीर दुबे उपस्थित होते. यावेळी तालुका समितीचे अध्यक्ष बबनराव देशमुख, उपाध्यक्ष उत्तमराव पिंजरकर, सचिव दादाराव ढोक, समाजसेवक विष्णू लोडम, निळकंठराव गिऱ्हे, ज्ञानेश्वर वानखडे, गोवर्धन पाथरे, गजानन सोनेकर, जानराव मुळे, प्रेमभैया कैथवास, नानाभाऊ मेहर, नारायण धामणे, दयाराम मोरे, राजू गवळी, सुरेश सावरकर, दीपक घाटे, गजानन घाटे, नितीन गावंडे, विलास वानखडे, किशोर गाडगे, गिरधर बोंडे, रूपराव मेहर, दशरथ दिवनाले, विजय गावंडे, जगदीश जोगडे, बंडूभाऊ सांगळूदकर, लक्ष्मण बावणे, गजानन सावरे, मनोहर झडगे, रवींद्रबापू देशमुख आणि श्रावण तिवस्कर यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

लोक कट्टा न्यूज | जनतेच्या हक्काचा आवाज