
डीजेविना पारंपरिक पद्धतीने उत्सव; कायदा व सुव्यवस्था राखण्यात नागरिकांचे मोलाचे सहकार्य
लोक कट्टा न्यूज
मूर्तिजापूर : श्री गणेशोत्सव तसेच दुर्गादेवी व शारदा देवी उत्सव मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांततेत आणि उत्साहात पार पडला. यंदा ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांनी दाखविलेल्या सामाजिक जबाबदारीमुळे उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत झाली.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्सव काळात योग्य नियोजन केले.
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, मूर्तिजापूर वकील महासंघ, ज्येष्ठ नागरिक, आपत्कालीन पथक, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उत्सव मंडळांचे पदाधिकारी, युवक मंडळे आणि नागरिकांनी सहकार्य केले.
सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. आगामी काळातही नागरिकांनी सण-उत्सव शांततेत साजरे करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मूर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दीपक महाडिक यांनी केले.
