
कारंजा लाड : अभिनयाची आवड, डोळ्यांत मोठी स्वप्ने आणि रुपेरी पडद्यावर झळकण्याची जिद्द घेऊन महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नवोदित कलाकारांच्या उपस्थितीने कारंजा लाड येथे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी ‘वावर’ या चित्रपटासाठी आयोजित राज्यस्तरीय ऑडिशनला तब्बल ६०० ते ७०० हून अधिक कलाकारांनी हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या ऑडिशनमुळे स्थानिक आणि नवोदित कलाकारांना चित्रपटसृष्टीत आपले कौशल्य दाखविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
युनिव्हर्सल मीडिया ग्रुपच्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी ट्विनकल स्टार कॉन्व्हेंट, कारंजा लाड येथे या ऑडिशनचे आयोजन करण्यात आले होते. वाशिम, अकोला, अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर यांसह महाराष्ट्रातील विविध भागांतून कलाकार या संधीसाठी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, बालकलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत विविध वयोगटांतील स्पर्धकांनी आपली अभिनयकला सादर केली.
अभिनयकौशल्यासह संवादफेक, व्यक्तिमत्त्व आणि सादरीकरणाचे परीक्षण करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रफुल्ल उकंडराव इंगोले, अभिनेत्री मीरा बोंडे, अभिनेता संतोष गावंडे (तात्या), संचालिका माया धोटे, माया हिम्मतराव धोटे, कार्यकारी निर्मात्या श्रद्धा गजभार तसेच निर्माते बंटी मर्ढे, विठ्ठल जाधव आणि निलेश हारदे यांची उपस्थिती होती.स्थानिक कलाकारांना मोठी संधी!या प्रसंगी दिग्दर्शक प्रफुल्ल उकंडराव इंगोले यांनी सांगितले की, या भागातील कलाकारांमध्ये प्रचंड कलागुण आहेत. त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्या अभिनयाला संधी उपलब्ध करून देणे, हा या ऑडिशनमागील प्रमुख उद्देश आहे. ऑडिशनमधून निवड झालेल्या कलाकारांची अंतिम यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमाच्या आयोजनासाठी ज्ञानेश्वर कांचानपुरे, प्रभाकर सोमकुवार, हिराकांत अंभोरे, प्रवीण चव्हाण आणि राहुल लढाऊ यांनी नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. कॅमेरामन विलास गायकवाड, विजयराव साबळे (अकोला), सुहाना वायदंडे, गजानन चव्हाण आणि दिलीप सिरसाट यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी अनेक रिल्स क्रिएटर्स, रीलस्टार आणि यूट्यूबर्स यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विजय रौराळे यांनी केले.