मूर्तिजापूर प्रतिनिधी |मूर्तिजापूर तालुक्यातील शिरसो ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामसेवक कॉलनी परिसरात सार्वजनिक वापरासाठी असलेल्या हातपंपाच्या वापराबाबत एक नवीन विषय चर्चेत आला आहे.

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक हातपंपामध्ये विद्युत मोटर बसवून त्यावरून काही खाजगी नळजोडण्या करण्यात आल्याची बाब एका नागरिकाने ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.यासंदर्भात संबंधित नागरिकाने ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सार्वजनिक हातपंपातील विद्युत मोटर व खाजगी नळजोडण्यांबाबत वस्तुस्थिती तपासण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे, सध्या पाणीटंचाईचे प्रश्न अनेक ठिकाणी जाणवत असताना सार्वजनिक वापरासाठी असलेल्या पाणी स्रोताचा वापर नेमका कोणत्या पद्धतीने होत आहे, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.

सदर मोटर व नळजोडण्या ग्रामपंचायतीच्या पूर्वपरवानगीने आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बसविण्यात आल्याचे संबंधितांकडून सांगितले जात असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या कामासाठी परवानगी कोणी दिली, साहित्य कोणी उपलब्ध करून दिले आणि याबाबत ग्रामपंचायतीच्या अभिलेखात काही नोंदी आहेत का, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आता या प्रकरणात प्रत्यक्षात काय घडले आहे? सार्वजनिक हातपंपावर मोटर बसविण्याची परवानगी देण्यात आली होती का? खाजगी नळजोडण्यांबाबत ग्रामपंचायतीची अधिकृत भूमिका काय आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होतील.सार्वजनिक पाणी स्रोताचा वापर आणि नागरिकांचा पाण्यावरील हक्क या दृष्टीने शिरसो ग्रामसेवक कॉलनीतील हा विषय सध्या चर्चेचा ठरत आहे.

या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत प्रशासनाची बाजू जाणून घेतल्यानंतर पुढील भागात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.शिरसो ग्रामपंचायत प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us