मूर्तिजापूर तालुक्यातील संत पुंडलिक महाराज यांची जन्मभूमी असलेल्या गोरेगाव येथे यंदा दुष्काळी परिस्थितीचे सावट असतानाही पारंपरिक गोवर्धन पूजा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी गोधनासह काटेपूर्णा नदीचे विधिवत पूजन करून नदीमातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उत्सवातून भारतीय संस्कृती, सभ्यता आणि परंपरेचे अनोखे दर्शन घडले.

गोरेगाव येथील गोवर्धन पूजा उत्सवाला ऐतिहासिक महत्त्व आहे. निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी सुमारे ९१ वर्षांपूर्वी, १९३५ मध्ये वसुबारसच्या दिवशी गावातील गोधनासह नदीपूजन करण्याच्या उद्देशाने या उत्सवाची सुरुवात केली होती. संत पुंडलिक महाराज यांच्या पावन जन्मभूमीत सुरू झालेली ही परंपरा आजही ग्रामस्थांकडून श्रद्धेने जपली जात आहे.

संत गाडगेबाबांनी अंगदराव सानप, खंडूजी पातोंड, माधवराव मुंडे, अभिमानदास सरदार, उरकड महाराज, देवराव कराड, तुकाराम सोनोने, आत्माराम गावंडे आणि रामराव डोईफोडे यांच्यासह गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन या उत्सवाची सुरुवात केली होती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

उत्सवाच्या निमित्ताने काटेपूर्णा नदीचे पूजन करून गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सोहळ्यासाठी नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले ग्रामस्थही आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

या उत्सवातील महाप्रसादाचेही विशेष वैशिष्ट्य आहे. महाप्रसादामध्ये येसुराच्या भाजीला विशेष महत्त्व असून गोरेगावसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतात. विशेष म्हणजे या दिवशी गावातील कोणत्याही घरी स्वतंत्रपणे स्वयंपाक केला जात नाही, तर सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे महाप्रसादाचा आनंद घेतात, अशी माहिती विजय डोईफोडे यांनी दिली.

उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विवेक पातोंड, वासुदेव पातोंड, गायक बाळ गंगाधर सरदार, विद्याधर सरदार, सुदाम सरदार, विजय डोईफोडे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभते.

दुष्काळी परिस्थितीतही परंपरेची अखंड ज्योत!

संत गाडगेबाबांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. गोधनाचे महत्त्व, निसर्गाप्रती कृतज्ञता, सामूहिक एकोपा आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारा गोरेगावचा हा उत्सव पंचक्रोशीत विशेष आकर्षण ठरत आहे, अशी भावना ग्रामस्थ डोईफोडे यांनी व्यक्त केली.

लोक कट्टा न्यूज — जनतेचा आवाज, जनतेच्या हक्कासाठी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
News
Youtube
About Us