
संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवा – ठाणेदार धर्मेंद्र जोशीमुर्तिजापूर
तालुका प्रतिनिधी तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन घरफोडी, चोरी तसेच मालमत्तेसंबंधी गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून आपल्या घरासह शेतीतील साहित्य व जनावरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी केले आहे
घराला कुलूप लावून बाहेर जाताना शेजाऱ्यांना किंवा पोलिसांना माहिती द्यावी. घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने ठेवणे टाळावे. शेतीतील मोटारपंप, केबल, बॅटरी, सोलर पॅनल व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जनावरांच्या गोठ्यांना मजबूत कुलूप लावावे. तसेच गावात रात्रीच्या वेळी सामूहिक गस्त सुरू ठेवून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे
ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. गावात संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी. प्रत्येक गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. कोणतीही संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास विलंब न करता ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस प्रशासन सतर्क; नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन चोरी, घरफोडी किंवा लुटमारीसारखे प्रकार घडू नयेत, यासाठी मुर्तिजापूर पोलीस प्रशासन सतर्क असून नियमित पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास पोलिसांना सहकार्य करावे. नागरिकांची जागरूकता आणि पोलिसांचे सहकार्य यामुळेच सुरक्षित समाज निर्माण होऊ शकतो, असे आवाहन ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी केले आहे.
लोक कट्टा न्यूज — जनतेचा आवाज, जनतेच्या हक्कासाठी!