
काकांच्या घरातील दागिने पुतण्यानेच चोरले; ६४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
वाशिम जिल्हा प्रतिनिधी मानोरा : घराला कुलूप लावून शेतात गेलेल्या शेतमजुराच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, मानोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत या चोरीचा छडा लावत आरोपीला जेरबंद केले. धक्कादायक बाब म्हणजे, या चोरीमागे फिर्यादीच्या सख्ख्या पुतण्याचाच हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भास्कर प्रल्हाद मनवर (वय ४५, व्यवसाय शेतमजुरी, रा. हिवरा बु., ता. मानोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते घराला कुलूप लावून भाजीपाला आणण्यासाठी व कापूस वेचणीसाठी शेतात गेले होते. घराच्या समोरील खोलीतील खिडकीत त्यांनी कुलूपाची चावी ठेवली होती. सायंकाळी घरी परतल्यानंतर घरातील कपाटाची तपासणी केली असता सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये चांदीचे पायातील कडे, तोरड्या, हातातील पाटल्या, सौभाग्य पोत, मणी डोरले पोत, कानातील टॉप्स, सोन्याच्या बाळ्या तसेच चांदीचा हंस अशा एकूण ६४ हजार ९६० रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश होता. याप्रकरणी १२ नोव्हेंबर रोजी मानोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.*तपासाची चक्रे वेगाने फिरली अन् पुतण्याचे बिंग फुटले*घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नैना पोहेकर व तपास अधिकारी सहायक फौजदार साहेबराव राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक व्हॅन तसेच अंगुलीमुद्रा तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परिसरातील नागरिक व साक्षीदारांची चौकशी केली असता फिर्यादीचा पुतण्या विवेक कुमार मनवर (वय २२, रा. हिवरा, ता. मानोरा) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने त्याने शेतातील धुऱ्यावर तुराट्याच्या गंजीजवळ जमिनीत पुरून ठेवले होते. पोलिसांनी पंचांसमक्ष हे दागिने बाहेर काढून जप्त केले. अशा प्रकारे चोरीला गेलेला ६४ हजार ९६० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरीही यशस्वी कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नैना पोहेकर व सहायक फौजदार साहेबराव राऊत यांनी केली. या पथकात पोलीस हवालदार संदीप जाधव, राधेश्याम महल्ले, पोलीस अंमलदार आशिष एकाडे, विजय जाधव, रोहन तायडे तसेच चालक रुपेश नाईक यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार साहेबराव राऊत करीत आहेत. अवघ्या २४ तासांत चोरीचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत केल्याने मानोरा पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.