
जळगाव (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे सौम्य धक्के जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, सावदा आणि जामनेर यांसह परिसरातील काही भागांत जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच आमदार श्री. नंदकिशोर महाजन यांनी जिल्हा प्रशासनाकडून तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित यंत्रणांकडून भूकंपाच्या धक्क्यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
प्रशासनाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही आमदार महाजन यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि अफवांपासून दूर राहावे.
लोक कट्टा न्यूज — जनतेचा आवाज, जनतेच्या हक्कासाठी!