
मूर्तिजापूर : “आम्ही शेती वाचवायला तयार आहोत, पण अन्यायाने जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरू,” असा स्पष्ट आणि धारदार इशारा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. मातोडा, धनज खुर्द, शहादतपूर, वडगाव आणि वडुरा परिसरातील गट क्रमांक १३९ ते १८० मधील संयुक्त मोजणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मूर्तिजापूर येथे सामूहिक निवेदन सादर करत आपल्या मागण्यांचा पाढा वाचला.प्रकल्पासाठी संयुक्त मोजणीची यादी प्रसिद्ध झाली असली, तरी प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या हाती अद्याप लेखी नोटीस पडलेली नाही. काहींना तर केवळ व्हॉट्सअॅपवरून माहिती कळली, तर अनेक शेतकरी रोजीरोटीसाठी किंवा कामानिमित्त बाहेरगावी आहेत. अशा परिस्थितीत ‘गैरहजर राहिल्यास एकतर्फी मोजणी होईल आणि तक्रार ऐकली जाणार नाही’ हा नोटीसीतील मजकूर शेतकऱ्यांची कोंडी करणारा असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. पहिल्या मोजणीला कोणी गैरहजर राहिल्यास त्याला दुसरी संधी आणि रीतसर नवी नोटीस देऊनच मोजणी करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.सुपीक बागायती जमिनीचा प्रश्न ऐरणीवरसंबधित गटांमधील जमीन केवळ कागदावरचा आकडा नसून, ती सुपीक आणि बारमाही बागायती आहे. विहिरी, फळझाडे आणि सिंचन सुविधांवर शेतकऱ्यांनी आयुष्यभराची पुंजी आणि लाखो रुपये खर्च केले आहेत.
त्यामुळे खुल्या कालव्याऐवजी भूमिगत जलवाहिनीचा पर्याय किंवा पडीक व कोरडवाहू जमिनीचा मार्ग तपासून सुपीक जमीन वाचवता येईल का, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे शेतकऱ्यांनी सुचवले आहे.“सही करण्यापूर्वी वाचण्याची संधी आणि जागेवरच प्रत द्या”मोजणीची प्रक्रिया केवळ औपचारिकता न राहता ती पारदर्शक व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी काही व्यावहारिक अटी पुढे केल्या आहेत: * मोजणीच्या वेळी संबंधित धारक, लगत धारक, ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंच यांची उपस्थिती असावी. * हद्द, मोजमाप आणि क्षेत्र जागेवरच शेतकऱ्याला दाखवले जावे. * मोजणी पत्रकावर सही करण्यापूर्वी ते वाचण्याची संधी मिळावी आणि त्याची एक प्रत त्याच क्षणी धारकाच्या हातात दिली जावी.मोबदला, नोकरी आणि हरकतीचा हक्कभूसंपादन कायदा २०१३ नुसार प्रचलित बाजारभावाने मोबदला मिळावा; जुना रेडीरेकनर दर लावून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, अशी मागणीही जोरकसपणे करण्यात आली आहे. विहिरी, फळझाडे, बांधकामे आणि सिंचन व्यवस्थेचे स्वतंत्र मूल्यांकन करून भरपाई द्यावी, तसेच प्रत्येक बाधित कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला नोकरी आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “मोजणी झाली म्हणजे शेतकऱ्याने भूसंपादनाला संमती दिली, असे मानू नये; भूसंपादनाच्या प्रत्येक टप्प्यावर हरकत नोंदवण्याचा हक्क अबाधित ठेवावा,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.मोबदला आणि पर्यायी मार्गांबाबत शेतकऱ्यांशी लेखी चर्चा करूनच पुढील पावले उचलावीत; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. आता प्रशासन या हरकतींवर काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणता तोडगा काढते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.